रत्नागिरी: भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढत असताना आलेल्या मोठ्या लाटेसोबत भाटकरवाडा येथील महिला समुद्रात कोसळली. अचानक समुद्रात वाहून जाणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला मिलके कुटुंबाच्या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या अफाट धाडसामुळे जीवदान मिळाले आहे. सबीला भाटकर (वय ३५, रा. भाटकरवाडा) असे प्राण वाचवण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सबीला भाटकर या भगवतीनगर येथील समुद्रात कालवं काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र,
अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या धक्क्याने त्या समुद्रात कोसळल्या. समुद्राच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्या अचानक खोल पाण्यात वाहून जाऊ लागल्या. या गंभीर प्रसंगी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या मिलके सर आणि गौरी मिलके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. तरुण करण मिलके याने स्वतःच्या जीवाची अजिबात परवा न करता थेट समुद्राच्या उधाणलेल्या पाण्यात उडी घेतली.
समुद्रातील तीव्र प्रवाहात पोहत जाऊन करणने सबीला भाटकर यांना सुखरूपपणे पाण्याबाहेर काढले. बचावलेल्या सबिला भाटकर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
संकटाच्यावेळी मिलके सरांचे अचूक मार्गदर्शन आणि करणने दाखवलेले असीम धैर्य, तत्परता व मानवतेची भावना खरोखरच कौतुकास्पद आहे.






