GRAMIN SEARCH BANNER

कडवई गावात उभारले कोकणातील पहिले सतीशिळा स्मारक

Gramin Varta
69 Views

संगमेश्वर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कडवई गावाने इतिहास संवर्धनाच्या क्षेत्रात एक उल्लेखनीय कार्य करून महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भवानगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावात विखुरलेल्या प्राचीन सतीशिळांचे एकत्रित जतन करून उभारण्यात आलेले स्मारक कोकणातील पहिले सतीशिळा स्मारक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

स्थानिक इतिहास, लोकसहभाग आणि वारशाचे संवर्धन यांचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन पुणे येथील इतिहास संशोधक व सतीशिळा अभ्यासक अनिल दुधाने यांच्या हस्ते पार पडले. कडवई गावात अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी प्राचीन सतीशिळा विखुरलेल्या अवस्थेत पडून होत्या. काही शिळा ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र बनल्या होत्या, तर काही दुर्लक्षित अवस्थेत होत्या. या शिळांमध्ये तत्कालीन समाजजीवन, स्त्रियांचे स्थान आणि सामाजिक परंपरांचे महत्त्वपूर्ण संदर्भ दडलेले असल्याने त्यांचे ऐतिहासिक महत्त्व विशेष मानले जाते. सती गेलेल्या स्त्रियांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या दगडी शिळांवर स्त्रीप्रतिमा, हाताची आकृती, सूर्य-चंद्राची चिन्हे तसेच तत्कालीन लिपीतील लेखन कोरलेले आढळते.

या मौल्यवान वारशाचे जतन व्हावे, या उद्देशाने इतिहासप्रेमी अजित राणे यांनी गावातील सर्व सतीशिळा एकत्रित करून त्यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प केला. प्रारंभी ग्रामस्थांमध्ये या शिळांविषयी धार्मिक भावना असल्याने तसेच त्यांचे दैवतीकरण झाल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र इतिहास अभ्यासकांनी गावाला भेट देऊन शिळांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. त्यानंतर आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाची अधिकृत परवानगी घेऊन स्मारक उभारणीचे काम सुरू करण्यात आले. विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार सर्व सतीशिळांची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करण्यात आली. प्रत्येक शिळेसोबत तिची माहिती देणारे फलक उभारण्यात आल्याने या स्मारकाला अभ्यासात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे.

या स्मारकामुळे विखुरलेल्या सतीशिळांचे सुरक्षित संवर्धन शक्य झाले असून स्थानिक इतिहास पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. इतिहास संशोधक, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे स्मारक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. कडवई गावाचा हा उपक्रम भविष्यात इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून सांस्कृतिक वारसा जतनासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा असतो, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

Total Visitor Counter

3399643
Share This Article