GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: मुर गावचा पूल दोन वर्षांनंतरही रखडलेलाच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ४ ते ५ गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Gramin Varta
7 Views

पाचल (अंकुश पोटले) : राजापूर तालुक्यातील मुर गावाला आणि परिसरातील चार ते पाच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मुर-कोलतेवाडी नदीवर असणाऱ्या पुलाचे काम तब्बल दोन वर्षे उलटून तिसरे वर्ष उजाडले तरी अद्याप अपूर्णच आहे. हा पूल कधी पूर्ण होणार, याकडे आता संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. दोन वर्षे रखडलेले हे काम कंत्राटदार राजेश सावंत यांनी दिवाळीच्या सुमारास पुन्हा सुरू केले होते. त्याला आता सहा ते सात महिने पूर्ण झाले, तरीही बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंचे साईड पट्टीचे काम अद्याप बाकी आहे. प्रत्यक्ष जागेवर काम करणारे मजूर दिवसभर काम न करता बसून असल्याचे चित्र असून, त्यांना विचारणा केली असता, ‘आम्हाला वेळेवर साहित्य (मटेरिअल) आणि मशनरी मिळत नाही, मग आम्ही काम कसे करायचे?’ असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.

या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही प्रशासन जागे झालेले नाही. त्यामुळे या पुलाच्या रखडलेल्या कारभारामध्ये काही मोठ्या व्यक्तींचे हितसंबंध गुंतले आहेत का, अशी शंका आता जनतेतून उपस्थित केली जात आहे. दरम्यान, सध्या अवकाळी पाऊस सुरू झाला असून, हा पाऊस असाच वाढल्यास चार ते पाच गावांचे दळणवळण पूर्णपणे ठप्प होणार हे निश्चित आहे. १५ मे नंतर कोणत्याही रस्त्यावर डांबरीकरण केले जात नाही, असा बांधकाम विभागाचाच नियम आहे, कारण पावसाळ्यातील डांबरीकरण टिकत नाही आणि ते उखडून जाते. असे नियम असतानाही हा पूल अजूनही प्राथमिक बांधकाम अवस्थेतच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संभ्रम आहे.

मुर-कोलतेवाडी पूल वेळेत पूर्ण न झाल्यास पाचल बाजारपेठेशी जोडलेल्या या गावांचा संपर्क तुटणार आहे. तसेच येत्या १५ दिवसांत शाळा व महाविद्यालये सुरू होत असल्याने शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होणार आहेत. याचा फटका कोळंब, काजिर्डा, राणेवाडी, जांभवडे, मुर वरचीवाडी, मुर शेटयेवाडी, गुरव वाडी आणि साळवी वाडी अशा अनेक वाड्यांमधील जनतेला बसणार असून त्यांची वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या पुलाचे काम वेगाने सुरू करून ते पूर्णत्वास नेले नाही, तर सर्व जनता एकवटून प्रशासन आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Total Visitor Counter

3399643
Share This Article