देवरुख : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबाघाट परिसरात १८ चाकी ट्रकचा अपघात झाला. अरुंद वळणावर ट्रक वळवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी चालकाविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवार, १३ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंबाघाटातील चक्रीवळणापासून कोल्हापूरच्या दिशेला सुमारे ५०० मीटर अंतरावर घडली. सिद्दप्पा सुभाष मेत्री (वय ४०, रा. बागलकोट, कर्नाटक) हा अशोक लेलँड कंपनीचा १८ चाकी ट्रक (केए २८ डी ४२८०) घेऊन सापुतळे ते गोकाक या मार्गावर जात होता.
घाट उतरत असताना चालकाने अरुंद वळणावर ट्रक वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरेशी जागा नसताना निष्काळजीपणे ट्रक वळवल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन दरडीवर आदळला.
या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सिद्दप्पा मेत्री याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आंबाघाटात १८ चाकी ट्रकचा अपघात; चालकाविरोधात गुन्हा





