देवरुख: अभिरुची देवरुख आयोजित “स्वरोत्सव २०२६” या वार्षिक संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सावंतवाडी येथील तपस्या नाट्य निर्मिती संस्थेने सादर केलेल्या संगीत होनाजी बाळा या संगीत नाट्य प्रयोगाने स्वरोत्सव २०२६ ची सांगता झाली. चिं. य. मराठे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन श्री. अभय मुळ्ये यांनी, नृत्य दिग्दर्शन चैत्राली लिमये यांनी तर संगीत मार्गदर्शन श्री. विलास हर्षे आणि श्री. स्वप्नील गोरे यांनी केले होते. नाटकाला दमदार संगीत साथ करणारे ऑर्गन वादक श्री. विलास हर्षे, तबला वादक श्री. अभिनव जोशी व ढोलकीसाथ करणारे श्री. विकास नर यांनी रसिकांची उत्तम दाद मिळविली आणि नाटकातील पदांना पुरेपूर न्याय दिला. उत्तम रंगभूषा करणारे श्री. तारक कांबळी, वेशभूषाकार वैभवी पुराणिक यांनी आपापल्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या आणि नाटकांतील प्रसंगांना पूरक असा देखणा रंगमंच नेपथ्यकार श्री. बाळ पुराणिक यांनी साकारला.
प्रकाश योजना सांभाळणारे श्री. अभिषेक कोयंडे आणि पार्श्वसंगीत देणारे श्री. गणेशप्रसाद गोगटे यांचीही उत्तम साथ लाभली. होनाजी बाळा नाटकातील मोरशेटची भूमिका श्री. बाळ पुराणिक यांनी, तर उदाजीची भूमिका श्री. कैलास दामले यांनी साकार केली. संदीप वीरकर यांनी पुराणिक, भवान्या, दौलतराव, बच्चाजी अशा चार भूमिका, तर गणेश दिक्षित यांनी काशिराम, भिकाजीपंत , मदनसिंग अशी तिहेरी भूमिका पार पाडली. दिप्ती पंडित यांनी विठाबाई आणि यमुनाबाई अशी दुहेरी भूमिका केली आणि नाटकाच्या मध्यवर्ती असलेल्या गुणवतीच्या भूमिकेत मधुरा लाकडे यांनी उत्तम अभिनयाचे आणि नृत्याचे प्रदर्शन केले. नाटकाचे नायक होनाजी आणि बाळा यांच्या भूमिका अनुक्रमे स्वप्नील गोरे आणि अभय मुळ्ये यांनी साकारल्या आणि रसिकांना जुन्या संचातील रामदास कामत आणि भालचंद्र पेंढारकर यांची आठवण करून दिली. उत्तम गायन आणि अभिनय यासाठी श्री. स्वप्नील गोरे यांचे रसिकांनी विशेष कौतुक केले. त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला कडकडून टाळ्या तर पडल्याच, परंतु “श्रीरंगा कामलाकांता” या गाण्याला वन्समोअर मिळाला. नाटकातील सर्वच गाणी आणि नृत्याविष्कार रसिकांची दाद मिळवून गेले.
होनाजी बाळा हे नाटक पेशव्यांच्या शेवटच्या काळातील असून “होनाजी सयाजी शिलारखाने” या तत्कालीन प्रसिद्ध अशा शाहीर, कवी यांच्या जीवनावर आहे. साधारणपणे इ.स. १७५४ ते इ.स. १८४४ हा काळ होनाजीचा होता असे सांगितले जाते. होनाजीचा मित्र बाळा कारंजकर हे मूळ व्यवसायाने शिंपी होते, परंतु त्यांना लावण्या व तमाशा याची खूप आवड होती. होनाजींची अनेक कवने आणि लावण्या रागदारीवर आधारित असत. त्यांच्या जवळपास २५० लावण्या आहेत आणि पेशवाईच्या अस्ताला समाज प्रबोधनपर अनेक पोवाडेही रचले आणि गायले. होनाजीनी अनेक कवने, लावण्या “होनाजी बाळा” या जोडनावानेही रचल्या आणि गायल्या. या नाटकातील सुंदर कवित्व म्हणजेच “घनःश्याम सुंदरा” ही भूपाळी. ही भूपाळी आजही लोकांच्या मनात घर करून आहे आणि सहज गुणगुणली जाते. या नाटकामध्ये संगीत-गायन-नृत्य आणि अभिनय या सर्वांचा उत्कृष्ट मिलाप पाहायला मिळाला.
नाटकातील सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, सर्वच गाण्यांचे उत्तम सादरीकरण, त्याला लाभलेली सुमधुर ऑर्गन आणि दमदार तबला-ढोलकीची साथ, कल्पक आणि देखणे नेपथ्य, पूरक पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना, यथोचित रंगभूषा आणि वेशभूषा याला जोडूनच रासिकांचा उत्तम प्रतिसाद आणि अभिरुचीचे परिश्रम पूर्वक केलेले उत्कृष्ट नियोजन यामुळे स्वरोत्सव २०२६ ची सांगता दिमाखात तर झालीच पण एका आगळ्या वेगळ्या संगीत नाट्याविष्काराचा आस्वाद रसिकांनी घेतला आणि एका अविस्मरणीय अशा संगीत महोत्सवाचे साक्षीदार होण्याचे भाग्य उपस्थित रसिकांना लाभले.
अभिरुची तर्फे सर्वांचे स्वागत आणि कलाकार परिचय श्री. महेश आठल्ये आणि श्री. मंगेश प्रभुदेसाई यांनी केला. देवरुख नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. कविता नार्वेकर, रासिकाग्रणी श्री. अण्णा शहाणे, दामोदर शिवराम आणि कंपनीचे श्री. अभयशेठ गद्रे आदि प्रमुख देणगीदार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज पूजन करून आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभिरुची संस्थेतर्फे सर्व कलाकारांचे स्वागत पुष्पगुच्छ, अत्तरकुपी आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.
मंगेश प्रभुदेसाई यांनी संपूर्ण स्वरोत्सवासाठी सहाय्यभूत ठरलेल्या विविध संस्था आणि व्यक्ती यांचे आभार मानले. पं. राम मराठे आणि गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी स्मृति सांगता समारंभानिमित्त संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, ऑर्गन वादक आणि संगीत मार्गदर्शक श्री. विलास हर्षे यांना संगीत रंगभूमीच्या केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी ‘सेवा सहयोग पुरस्काराने’ नुकतेच सन्मानित करण्यात आले होते, यासाठी अभिरुची तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन उचित सन्मान करण्यात आला. मध्यंतरात अभिरुचीचे अध्यक्ष श्री. आशिष प्रभुदेसाई यांनी २१व्या वर्षातील विशेष स्वरोत्सवाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यामध्ये रसिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ॲड. समीर आठल्ये, सोहम प्रभुदेसाई आणि शौनक आठल्ये यांनी विशेष मेहनत घेतली.




