लांजा : तालुक्यातील खानवली येथे राहणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवाडी, खानवली येथील रहिवासी असलेल्या रिद्धी रघुनाथ कालकर (वय ४ वर्षे) हिला १० ऑगस्ट रोजी अचानक दम लागू लागला. तिच्या वडिलांनी, रघुनाथ तुकाराम कालकर यांनी तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले. त्यानंतर तिला घरी आणण्यात आले. मात्र, १३ ऑगस्ट रोजी तिची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे दुपारी ४.४५ वाजता तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले, परंतु दुर्दैवाने सायंकाळी ७.४५ वाजता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
या घटनेमुळे कालकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. लांजा पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.