रायगड: अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हसूबाई शांताराम पाटील यांचे वयाच्या १११ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.वयाची शंभरी पार केल्यानंतरही कणखर आवाज आणि सुदृढ प्रकृती असलेल्या हसूबाई पाटील या शेवटच्या क्षणापर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. सुतिका शास्त्राची उत्तम जाण असलेल्या हसूबाई यांनी अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने सुईणीचे कार्य करत परिसरातील अनेक महिलांची यशस्वी प्रसूती घडवून आणली. त्यामुळे पंचक्रोशीतील स्त्रीवर्गात त्यांचे मोठे स्थान होते.समाजकार्याबरोबरच त्यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला. १९५२ साली स्थापन झालेल्या शहापूर ग्रुप ग्रामपंचायतीत १९७९ पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. मात्र १९८० साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनेते दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन रा. मोकल, कृष्णा गोविंद पाटील आणि हसूबाई शांताराम पाटील हे सदस्य निवडून आले. त्या ग्रामपंचायतीतील पहिल्या महिला सदस्य ठरल्या आणि त्यांनी राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.२००५-०६ मध्ये शहापूर औद्योगिक झोन जाहीर होण्याच्या अधिसूचनेनंतर प्रस्तावित रिलायन्स आणि टाटा वीज प्रकल्पांविरोधात झालेल्या आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अलिबाग येथे ठिय्या आंदोलन तसेच अलिबाग ते मुंबई पायी मोर्चामध्ये सहभागी होत त्यांनी नारीशक्तीचा बुलंद आवाज उठवला. तसेच २०१९ ते २०२५ दरम्यान शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातही त्यांनी हिरिरीने भाग घेतला.नऊ गाव शेतकरी संघटना संघर्ष समितीचे सदस्य सुनिल नाईक, राजेंद्र भगत, सुनिल पाटील यांनी भावुक होऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. समितीचे सचिव नंदन पाटील यांनी “शतकी वय ओलांडूनही सामाजिक कार्यात सक्रिय राहणाऱ्या या झुंझार कार्यकर्तीस मरणोत्तर प्रणाम,” असे गौरवोद्गार काढले.कै. हसूबाई पाटील यांच्या पश्चात सहा मुली, तीन मुले, जावई, सुना तसेच ३६ नातवंडे आणि ४६ पणतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रातील एक लढवय्या व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Related News

