GRAMIN SEARCH BANNER

अलिबाग : कुटुंबाला वेठीस धरून १८ लाखांचा दरोडा

Gramin Varta
109 Views

अलिबाग : पोलीस ठाणे हद्दीतील मौजे मापगाव येथे मध्यरात्री भीषण दरोड्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ८ ते ९ अनोळखी इसमांनी एका कुटुंबाच्या घरात घुसून चाकू, सुरे व लोखंडी रॉडचा धाक दाखवत जबरी चोरी केली.

या घटनेत आरोपींनी कुटुंबीयांना मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या हॉलमधील स्लायडिंग खिडकी उचकटून व लोखंडी ग्रिलचे लॉक तोडून आरोपी घरात घुसले. आरोपी मराठी व हिंदी भाषेत परस्परांशी बोलत असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. घरात शिरताच आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाचे हात बांधून तोंडाला सेलोटेप लावले व त्याला बळजबरीने घराच्या मागील बाजूस कंपाउंडबाहेर नेऊन ठार मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी व घरातील इतर सदस्यांना मारहाण केली.

फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून मारण्याची धमकी देत दोघांचे हातपाय बांधून तोंडाला सेलोटेप लावण्यात आली. त्यानंतर चाकू, सुरे व लोखंडी रॉडचा धाक दाखवत घरातून एकूण १८ लाख २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ व दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(२), ३१०(५), ३११, १२७(२), १३७(२), ३५१(३) व १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Total Visitor Counter

3214059
Share This Article