GRAMIN SEARCH BANNER

कोकणवासियांच्या निर्विघ्न प्रवासासाठी सज्जता; नवी मुंबई पोलिसांचा विशेष वाहतूक आराखडा

पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना वाहतुकीतील अडथळ्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. शनिवारपासून ते २६ ऑगस्टपर्यंत शीव-पनवेल महामार्गासह नवी मुंबईतील इतर महामार्गांवर हे नियोजन राबवले जाणार आहे.

टोलमाफीपासून मदत केंद्रांपर्यंत सर्व सोयी यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना नवी मुंबईतील कोणत्याच महामार्गावर अडथळ्यांचा सामना करावा लागू नये यासाठी विशेष खबरदारी घ्या अशा सूचना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाला दिल्या होत्या. याच सूचनेनंतर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी गणेशोत्सवासाठी खास वाहतूक आराखड्याचे नियोजन केले. या आराखड्याबाबत अंतिम आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बेलापूर पोलीस विभागात बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त काकडे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपायुक्त विजय चौधरी आणि १४ वाहतूक पोलीस ठाण्यांचे सर्व वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. या आराखड्यानूसार शनिवारपासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्य नेतृत्वाखाली ६२ पोलीस अधिकारी आणि तब्बल ७०० कर्मचारी रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करणार आहेत.

शुक्रवारी शेकडो वाहने कोकणात जातील असा अंदाज वाहतूक विभागाचा होता. मात्र अमावस्या असल्याने कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या शुक्रवारी कमी होती. मात्र शनिवारनंतर कोकणात जाणाऱ्या वाहनांची गर्दी नवी मुंबईच्या महामार्गांवर होण्याची शक्यता ध्यानात घेऊन हे नियोजन पोलिसांनी केले आहे. शनिवारी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार एसटी गाड्या कोकणात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन या वाहतूक आराखड्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न आणि सुरक्षित व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक विभाग सज्ज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक नियोजनाची वैशिष्ट्ये

टोलमाफीसाठी वाहनचालकांना पास आवश्यक
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीची सुविधा मिळावी यासाठी विशेष पास काढणे बंधनकारक ठरविण्यात आल्यामुळे वाहनचालकाचा परवाना, वाहनाची कागदपत्रे हे दिल्यास अवघ्या पाच मिनिटांमध्ये वाहतूक चौकीतून आणि स्थानिक पोलीस ठाण्यातून वाहनचालक हे पास काढू शकतील.

तीन मदत केंद्रे
मुंबईवरून नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी तीन ठिकाणी विशेष मदत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. येथे प्रवाशांना वाहतुकीची माहिती, आवश्यक सुविधा आणि पोलिसांचे तातडीचे सहकार्य मिळेल.

नादुरुस्त वाहनांसाठी ११ क्रेन
प्रवासादरम्यान वाहन नादुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्गावर ११ क्रेन व १४ मेकॅनिक सतत उपलब्ध राहतील. त्यामुळे अडकलेली वाहने लगेच हलवून मार्ग मोकळा करता येईल.

आपत्कालीन साहित्य
वाहतूक मदत केंद्रांवर अपघातग्रस्तांसाठी आवश्यक औषधे, प्राथमिक उपचाराची साधने, रुग्णवाहिका आणि टॉर्च, रस्सी यांसारखे आपत्कालीन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सोयींमुळे आकस्मिक परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकेल.

कोंडी फोडण्यासाठी २२ बीट मार्शल
वाहतूक कोंडीच्या वेळी तत्काळ घटनास्थळी पोहोचता यावे म्हणून पोलिस विभागाने २२ बीट मार्शलना दुचाकीसह तैनात केले आहे. ते गर्दीच्या ठिकाणी त्वरीत पोहोचून वाहतुकीला सुरळीत करतील.

सीसीटिव्हीद्वारे देखरेख
नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका आणि सिडकोच्या सीसीटिव्ही नियंत्रण कक्षातून महामार्गावरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी कोंडी किंवा अडथळा दिसताच नियंत्रण कक्षातून पोलिसांना तात्काळ सूचना दिल्या जातील.

कोकणात जाणाफया गणेशभक्तांना नवी मुंबईतील महामार्गांवरून निर्विघ्नपणे जाता यावे यासाठी नवी मुंबई पोलीस दलामार्फत व्यवस्थित बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. – तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई पोलीस दल

Total Visitor Counter

2475388
Share This Article