रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली घरकुले गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असून ती मूळ लाभार्थ्यांच्या नावावर करून कायमस्वरूपी देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी केली आहे. पक्षाच्या सेवा अभियानादरम्यान त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी मांडली.
विश्वनगरमधील ही घरकुले तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते कायमस्वरूपी वाटप करण्यात आली होती. मात्र, नगरपरिषदेने वेळोवेळी केलेल्या विविध ठरावांमुळे ही घरे अद्याप लाभार्थ्यांच्या नावावर होऊ शकलेली नाहीत. त्यातच नगरपरिषदेने २० ऑक्टोबर २०२१ रोजी ठराव क्र. ११३ मंजूर करून सदर घरकुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेतून सफाई कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. यामुळे पूर्वीच्या मूळ लाभार्थ्यांवर घरापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. हा ठराव महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ अन्वये रद्द करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली होती, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
हा प्रश्न याआधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारातही उपस्थित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते. आता सेवा अभियानाच्या माध्यमातून या विषयाला पुन्हा गती देण्यात आली आहे. एकात्मिक शहर विकास योजनेतील मूळ लाभार्थी आणि सफाई कर्मचारी या दोघांचाही विचार करून सर्वसमावेशक तोडगा काढावा, भाडेतत्त्वावर घरे देण्याचा ठराव क्र. ८० रद्द करावा आणि सुधारित धोरणात्मक निर्णय घेऊन सर्वांना मालकी हक्काची घरे द्यावीत, अशी मागणी निलेश आखाडे यांनी लावून धरली आहे. या अभियानाद्वारे जिल्ह्यातील अशा प्रलंबित प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे.






