मंडणगड: शहरातील साई नगर परिसरात भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण हजारोंचा ऐवज लंपास केला आहे.
साई नगरमधील रहिवासी श्री. अभिजित विलणकर हे दुपारी काही खरेदीसाठी बाजारात गेले होते. त्याच वेळेस अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने कपाटातील सुमारे २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ८,००० रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे.
बाजारातून परत आल्यानंतर घरात झालेल्या चोरीची कल्पना विलणकर यांना आली. त्यांनी तातडीने शेजारी व नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनाही घटनेबाबत सूचित करण्यात आले. माहिती मिळताच मंडणगड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील कार्यवाहीस सुरुवात केली.
विलणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरातून १० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या साखळ्या, ३ ग्रॅमची एक साखळी, १ तोळ्याचा गळ्यातील हार, ३ ग्रॅमचे कानातील जोड तसेच ८ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे.
या चोरीमुळे मंडणगड शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामीण व निमशहरी भागात वाढत चाललेली गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरत आहे. मंडणगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मंडणगड: भर दिवसा चोरट्यांनी घर फोडले
