रायगड: मुंबईला लागून असलेला रायगड जिल्हा आता ड्रग्ज तस्करीचा अड्डा बनत चालला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत रायगड पोलिसांनी विविध कारवायांमध्ये तब्बल 400 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. परदेशातून समुद्रमार्गे ड्रग्जची तस्करी होत असतानाच, जिल्ह्यात अनेक उद्योगांच्या नावाखाली बेकायदेशीर अंमली पदार्थ निर्मितीचे कारखाने सुरु असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत आहे.
कर्जतमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान एका बनावट सिगारेट फॅक्टरीवर कारवाई झाली, त्यानंतर छोट्या-मोठ्या कारवाया सुरूच आहेत. मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी रायगडमधील दुर्गम भागांत, विशेषतः कर्जत, खालापूर आणि पेण येथे, अंमली पदार्थांचे अड्डे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणांवरून अंमली पदार्थांसोबतच प्रतिबंधित तंबाखूजन्य वस्तूंचाही साठा केला जात होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, या प्रकरणांमधील मुख्य आरोपींचा शोध घेण्यात रायगड पोलिसांना अद्याप यश आलेले नाही, ज्यामुळे यावर पूर्ण निर्बंध घालणे शक्य झालेले नाही.
कर्जत, खालापूर, अलिबाग आणि दिवेआगर येथे मुंबई-पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील हॉटेल्स आणि फार्महाऊसमध्ये होणाऱ्या रात्रभर चालणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांची छुप्या मार्गाने तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये मेफेड्रॉन (MD), गांजा आणि चरस यांचा समावेश आहे. खालापूर तालुक्यात एका बेकायदेशीर मेफेड्रॉन कारखान्याचा पर्दाफाश झाल्याने रायगड जिल्ह्यातून परदेशातही अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर अफगाणी चरसची पाकिटे वाहून आली होती. अलिबाग, मुरुड, आणि श्रीवर्धन तालुक्यातील किनाऱ्यांवर सापडलेल्या 1 किलो 100 ग्रॅम वजनाच्या 185 पाकिटांची किंमत सुमारे 8 कोटी 25 लाख 11 हजार रुपये होती. याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन तपास सुरू असला तरी, ही पाकिटे कुठून आली याचा शोध अद्याप लागलेला नाही. या घटनेमुळे सागरी मार्गाने ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, खोपोली येथील ढेकू येथे एका इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या कारखान्यात बेकायदेशीरपणे मेफेड्रॉन तयार केले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी सुरुवातीला 85 किलो वजनाचे आणि 107 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले होते.
रायगडचे अपर पोलीस अधीक्षक, अभिजीत शिवतरे, यांनी नमूद केले की, तरुणाईमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढलेला आहे. ज्या वयात करिअर घडवायचे असते, त्या वयात तरुण व्यसनाधीन होत आहेत. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
लोकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे आणि तरुण व किशोरवयीन मुलांमधील अंमली पदार्थांचे व्यसन रोखणे हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचा मुख्य उद्देश आहे. ड्रग तस्करी रोखण्यासाठीही ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. किशोरवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थांचे व्यसन वाढत असून, त्यांची अवैध तस्करीही सुरू आहे. याच कारणास्तव, 7 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने समाजाला अंमली पदार्थमुक्त करण्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर, 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थंविरुद्ध दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले, जे सर्व देशांनी स्वीकारले. तेव्हापासून दरवर्षी 26 जून रोजी ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा केला जातो.