चिपळूण: चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाणे-राजवाडी जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी अल्पवयीन मुलींचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगला मनोहर वाघे (१५) आणि सुप्रिया यशवंत वाघे (१४) अशी या मृत मुलींची नावे आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाणे-राजवाडी येथील आदिवासी समाजातील या दोन मुली बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या शेळ्या घेऊन जवळच्या जंगलात गेल्या होत्या. बराच वेळ झाला तरी त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी जंगलात त्या दोघीही निपचित पडलेल्या आढळल्या. ही धक्कादायक घटना समोर येताच गावात एकच हाहाकार उडाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली. त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या मुलींचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, आदिवासी समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.