रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान फेसबुकवर पोस्ट करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार योगेश हळदवणेकर यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निमेश नायर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ मधील अपक्ष उमेदवार हळदवणेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नायर हे २ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता शहरातील अजीजा दाऊद हायस्कूल येथे आमने-सामने आले होते. मतदानादरम्यान हळदवणेकर यांनी बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाच्या घटनेनंतर, त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजून ३ मिनिटांनी हळदवणेकर यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती.
मतदान प्रक्रिया सुरू असताना हळदवणेकर यांनी ही पोस्ट केल्याबद्दल नायर यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. यापूर्वी, वादाच्या वेळी आपल्याला धक्काबुक्की झाल्याची तक्रार हळदवणेकर यांनीही शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. नायर यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हळदवणेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५३(२), ३५६(२) तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम कलम १२३(३अ) व १२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
योगेश हळदवनेकर यांनी केली होती निमेश नायर यांची तक्रार
दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक २ मध्ये दुपारी निमेश नायर आणि योगेश हळदवनेकर यांच्यात वाद झाला होता. अजीजा दाऊद हायस्कूल मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार योगेश हळदवणकर आले असताना त्यांनी तेथे बोगस मतदान होत असल्याचा आरोप केंद्राध्यक्षांकडे नोंदवला. यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये तीव्र वाद झाला. हळदवणेकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रागाच्या भरात नायर यांनी हळदवणेकर यांना शिवीगाळ करत हाताचा कोपरा मारून धक्काबुक्की केली. हळदवणकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, नायर हे सकाळपासून त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारे देत असल्याचाही आरोप केला होता. त्याच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, असा दावा करत त्यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणानंतर अवघ्या आठवडाभरातच निलेश नायर यांनी हळदवणेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. फेसबुक वर नगर परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान फेसबूकवर पोस्ट करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार नायर यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे.





