GRAMIN SEARCH BANNER

रायगड : लोणेरे येथे तरुणीच्या खून प्रकरणी लांजातील तरुणाला नवी मुंबईत अटक

स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलीचाही केला होता खून, शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचाही गुन्हा

‘त्या नराधमाला फाशीच द्या’ : लांजा ग्रामस्थांची मागणी

समीर शिगवण / रत्नागिरी : माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून, या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. ओमकार रेसिडेन्सी या लॉजमध्ये सोमवारी रात्री २२ वर्षीय तरुणीचा निरवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लांजा तालुक्यातील अनिश महंमद खान मालदार याला नवी मुंबईतून अटक केली असून, प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मृत तरुणी पल्लवी मोरे (वय २२, रा. वडगाव बौद्धवाडी, ता. माणगाव) हिची ओळख पटली असून, तिच्या हत्येने समाजमन सुन्न झाले आहे. मात्र, या घटनेपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीचा खून, शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या, महिलांची छेडछाड अशा घृणास्पद गुन्ह्यांचा काळा इतिहास त्याच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे.

इतकेच नव्हे तर आरोपीच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमीही तितकीच संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याच्या भावावरही शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याने संपूर्ण कुटुंबाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, लांजा तळवडे येथील उपसरपंच मोहम्मद पावसकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत या आरोपीला “समाजासाठी घातक नराधम” असे संबोधले. “अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला जिवंत ठेवणे म्हणजे समाजाच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच गावातील शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर तळवडे गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती आणि ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत असून, आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासाची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, “अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि जलद न्यायाची गरज” असल्याची जोरदार मागणी समाजातून होत आहे.

Total Visitor Counter

3310620
Share This Article