रत्नागिरी: शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागताच पर्यटनासाठी बाहेर पडणारे नागरिक आणि गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीने कोकण रेल्वेसह रस्ते वाहतूकही गजबजून गेली आहे. प्रवाशांची ही संभाव्य गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली असून, यंदाच्या हंगामात तब्बल १,००० पेक्षा अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी प्रवाशांनी खाजगी वाहनांपेक्षा हक्काच्या ‘लालपरी’लाच पसंती द्यावी, असे आवाहन महामंडळाने केले असून १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
सध्या रत्नागिरी विभागातील नऊ आगारांमधून दररोज सुमारे ३० जादा बसेस विविध मार्गांवर सोडल्या जात आहेत, मात्र मे महिन्याच्या सुरुवातीला गर्दीचा ओघ वाढताच ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला मुंबई आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याशी जोडणाऱ्या गाड्यांचे विशेष जाळे विणण्यात आले असून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या शहरांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. प्रवाशांनी यंदा खाजगी ट्रॅव्हल्सपेक्षा एसटीच्या विश्वासाला अधिक पसंती दिल्याचे चित्र असून आतापर्यंत सुमारे ७० टक्के जादा गाड्यांचे ऑनलाईन बुकिंग पूर्ण झाले आहे. ऐनवेळी होणारी धावपळ आणि उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपवरून आपले आरक्षण निश्चित करावे, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, धार्मिक पर्यटनाला जाणारा वर्ग लक्षात घेता अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांसाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मिरज, लातूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, अकोला, नंदुरबार, परभणी आणि बुलढाणा यांसारख्या शहरांसाठीही जादा बसेसचे नियोजन आहे. महिलांना तिकीट दरात मिळणारी ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींमुळे प्रवाशांचा कल महामंडळाकडे वाढला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी विभागातील नऊही आगारांमध्ये विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून, सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रवाशांनी वेळेत बुकिंग करून सुरक्षित प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.







