रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील एका अवघ्या आठ महिन्यांच्या बालिकेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हर्षदा अजय जाधव असे या मृत बालिकेचे नाव असून, याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा हिला तीव्र ताप आल्याने १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती खालावली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. हर्षदा हिचे कुटुंब सध्या पावस येथील मांडवकरवाडी स्टॉपजवळील एका झोपडीत वास्तव्यास आहे. या चिमुरडीच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूर्णगड पोलिसांनी १७ मार्च रोजी सायंकाळी या प्रकरणाची नोंद बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.






