राजन लाड / जैतापूर
राजापूर तालुक्यातील साखरी-नाटे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मच्छीमारी केंद्र आहे. येथे जवळपास २५० ते ३०० मच्छीमारी नौका नोंदणीकृत आहेत. दररोज शेकडो बोटी अरबी समुद्रात जाऊन मासेमारी करून परततात. अशा या महत्त्वाच्या बंदराच्या सुरक्षेसाठी जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे एक टॉवर उभारण्यात आला. टॉवरवर बावटा (ध्वज) लावून मच्छीमारांना धोक्याची सूचना देणे हा बंदर विभागाचा उद्देश होता. मात्र हा टॉवर साखरी-नाटे बंदर परिसरातून अजिबात दिसत नसल्याने तो केवळ नावापुरता ठरत असून मच्छीमारांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुरक्षा साधन की केवळ औपचारिकता?
मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उभारलेला हा टॉवर प्रत्यक्षात उपयोगी पडत नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरक्षेसाठी असलेली सुविधा जर मच्छीमारांनाच न दिसली, तर त्याचा काय उपयोग? असा थेट सवाल मच्छीमार करत आहेत. “धोक्याची सूचना देणारा बावटा केवळ कागदोपत्री आहे; प्रत्यक्षात समुद्रावर उतरताना आमच्या नजरेस तो लागतच नाही,” अशी नाराजी अनेक मच्छीमारांनी व्यक्त केली.
डुंगेरी भागात हलविण्याची मागणी – वजूद बेबजी
साखरी-नाटे मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमन वजूद बेबजी यांनी या संदर्भात आठवण करून दिली की “माझ्या कार्यकाळातच आम्ही बंदर विभागाकडे टॉवर साखरी-नाटे डुंगेरी भागात हलवावा अशी मागणी केली होती. कारण तो भागच मच्छीमारांसाठी सर्वाधिक दृश्यमान आहे. मात्र बंदर विभागाने आजवर कोणतीही कारवाई केलेली नाही. परिणामी आजही मच्छीमार या बिनकामाच्या टॉवरमुळे त्रस्त आहेत.”
मच्छीमारांच्या सुरक्षिततेशी तडजोड?
सध्या अस्तित्वात असलेला टॉवर केवळ जागेअभावी उभारला गेला की जबाबदारी झटकण्यासाठी? असा प्रश्न स्थानिकांतून उपस्थित होत आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या साधनाची दृष्यमानता ही मूलभूत अट आहे. तीच अट पूर्ण होत नसल्याने मच्छीमारांच्या सुरक्षिततेशी प्रत्यक्षात तडजोड केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
सरकार आणि बंदर विभागाने तातडीने पावले उचलावीत
मच्छीमारांच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाने आणि बंदर विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. स्थानिक मच्छीमारांचे ठाम म्हणणे आहे की –
“धोक्याची सूचना देणारा टॉवर हा प्रत्यक्षात उपयोगी पडला पाहिजे. तो जर समुद्रावरून मच्छीमारांना दिसणारच नसेल, तर ती रचना निरुपयोगी ठरते. त्यामुळे त्वरित डुंगेरी भागात हा टॉवर हलवून आम्हाला सुरक्षिततेची खरी हमी द्यावी.”
जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे उभारलेला धोक्याची सूचना देणारा टॉवर बिनकामाचा
