GRAMIN SEARCH BANNER

रखडलेल्या मुंबई–गोवा महामार्गाबाबत सरकारला जाग आणण्यासाठी तिरडी यात्रा सुरू

Gramin Varta
302 Views

रत्नागिरी : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण व संथ गतीने सुरू असलेले काम कोकणवासीयांच्या जीवावर उठले असून, या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश समितीने ‘तिरडी यात्रा’ या अभिनव आंदोलनाची सुरुवात केली आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे महामार्गावर तिरडी ठेवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

गेल्या अठरा वर्षांपासून महामार्गाचे काम रखडलेले असतानाही प्रशासनाकडून निश्चित कालबद्ध आश्वासन मिळत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. महामार्गावरील अपघात, खड्डे व अर्धवट कामांमुळे आतापर्यंत चार हजार पाचशेहून अधिक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले असतानाही शासन उदासीन का आहे, असा थेट सवाल जनआक्रोश समितीकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शासनाला जागे करण्याच्या उद्देशाने महामार्गावर तिरडी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला असून, आंदोलनादरम्यान तीव्र घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन ६ डिसेंबरपासून सुरू झाले असून रविवारी महामार्गावरील कोलेटी येथे त्याची सांगता होणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात १३ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत पुन्हा तिरडी आंदोलन राबवण्याचा निर्णय जनआक्रोश समितीने जाहीर केला आहे. या कालावधीत महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासह इतर प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनावर दबाव वाढवण्यात येणार आहे.

लोणेरे येथे पार पडलेल्या आंदोलनस्थळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ढाके यांनीदेखील उपोषणस्थळी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.

Total Visitor Counter

3368830
Share This Article