GRAMIN SEARCH BANNER

लांजा कुर्णे येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अंगावर वार, घातपाताचा संशय

Gramin Varta
664 Views

लांजा : तालुक्यातील कुर्णे गावात एका व्यक्तीचा घरातच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृताच्या अंगावर जखमेच्या खुणा आणि वार आढळल्याने हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

सुरेश रामचंद्र पड्ये (वय ४५, रा. कुर्णे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एकटेच घरी राहत होते. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सुरेश यांच्या मुलीने वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने सोमवारी रात्री चुलत काका शाम पड्ये यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले.

यानुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शाम पड्ये सुरेश यांच्या घरी गेले असता घरातच त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांना व तत्काळ लांजा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. अंधारामुळे मंगळवारी सकाळी श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.

अप्पर पोलिस अधीक्षक जयंत महामुन्नी, उपअधीक्षक राधिका फडके, निरीक्षक अमित यादव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस पथकाने पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक पाहणीत सुरेश पड्ये यांच्या डाव्या हातासह अंगावर जखमेच्या खुणा आणि वार आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर वार केले की कोणी अज्ञात व्यक्तीने त्यांचा घातपात केला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. १५ जानेवारी दुपारी तीननंतर ते घरात एकटेच असल्याने नेमका प्रकार कधी घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असून या प्रकरणाचा सखोल तपास लांजा पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3199275
Share This Article