आंबोली : येथे वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक 400 फूट खोल दरीत कोसळला. संबधित तरुण हा कोल्हापूर येथील जिल्हा परिषदचा कर्मचारी असून राजेंद्र बाळासो सनगर (वय 45, रा. चिले कॉलनी) असे त्यांचे नाव आहे. राजेंद्र हे आपल्या 14 मित्रांसोबत आंबोली कावळेसाद येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. दरम्यान ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी आंबोली पोलिसांनी धाव घेतली. मात्र दाट धुके असल्यामुळे मदतकार्यात अडचणी आल्या तसेच काळोख पडल्यामुळे ही मोहीम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या सकाळी रेस्क्यू पथकाच्या मदतीने पुन्हा एकदा राजेंद्र सनगर यांचा शोध घेण्यात येणार आहे, असे पोलिसांकडुन सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुर येथील सनगर ह्या जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. आज (27 जून) ते आपल्या मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कावळेसाद येथे आले होते. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र सनगर हे दरीतून उलट्या बाजूने येणाऱ्या पाण्यात रुमाल उडविण्याचा आनंद घेत होते. मात्र त्याचवेळी त्यांचा रुमाल दरीच्या तोंडावर पडला. त्यामुळे रुमाल आणण्यासाठी राजेंद्र सनगर गेले. मात्र संबंधित जागा निसरडी असल्यामुळे ते थेट दरीत कोसळले. हा प्रकार इतका भयानक होता की, कोणाच्या काहीच लक्षात आले नाही.
राजेंद्र सनगर दरीत कोसळल्याचे लक्षात येताच यांच्या मित्रांनी आरडाओरड केला आणि घडलेली घटना त्या ठिकाणी असलेल्या स्टॉल चालकांना सागितली. त्यानंतर स्टॉल चालकांनी याबाबतची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांना दिली. त्यानुसार ढोकरे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्यास सुरुवात केली. मात्र दरीत दाट धुके असल्यामुळे मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली. उद्या सकाळी ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
20 रुपयांच्या रुमालासाठी जीव गमवला: रुमाल काढण्यासाठी गेलेला युवक चारशे फुट दरीत कोसळला
