मुंबई :राज्य सरकारच्या पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषिक आणीबाणीला शिवसेनेचा प्रखर विरोध असून जबरदस्तीने राबविण्यात येणारा हिंदी सक्तीचा कार्यक्रम हाणून पाडू, असा इशारा देत ७ जुलै रोजी पुकारलेल्या आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटीहून मोर्चाची हाक दिली असून या मोर्चासाठी शिवसेना ठाकरे गटासह सर्वपक्षीयांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी हिंदी भाषा सक्तीविरोधात ७ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा दर्शविला.
पक्षीय भेदाभेद बाजूला सारू सर्व मराठी भाषिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. आम्हाला हिंदीचे वावडे नाही. देशात प्रत्येक भाषेनुसार प्रांत आहे. परंतु भाजप व संघला एकाधिकारशाहीचा छुपा अंजेडा राबवायचा आहे. रा. स्व. संघाचे भैय्याजी जोशी यांनी याची सुरुवात केली आहे. मात्र ही भाषिक आणीबाणी आम्ही खपवून घेणार नाही. मातृभाषेसाठी लढा उभा करू, सर्व मराठी माणसांनी, तमाम भाषा प्रेमीनी विशेषत: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांनी, पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावे, भाजपमधील अस्सल मराठीप्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले..
हिंदी सक्तीला विरोध कायम : राज ठाकरे
हिंदी सक्तीच्या निर्णयाबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ५ जुलैच्या आंदोलनाची घोेषणा केली. भुसे यांच्याकडे काही गोष्टींची उत्तरे नव्हती. हिंदीच काय अन्य कोणत्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. हिंदी सक्तीला पूर्णपणे विरोध असल्याचे मंत्र्यांना स्पष्टपणे बजावले आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याकडून आधी ६ जुलै ही तारीख जाहीर करण्यात आली, मात्र या दिवशी आषाढी एकादशी असल्याने शनिवारी ५ जुलैची तारीख जाहीर करण्यात आली. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल. या मोर्चात शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहान करण्यात येणार आहे. ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्षांना मोर्चाला बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले. एरव्ही मराठीविषयी अनेकजण बोलतात. त्यामुळे या मोर्चात कोण कोण सहभागी होते हे आम्हाला बघायचे आहे, असे ते म्हणाले.
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात; शिवसेनेचे ७ जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलन तर मनसेचा ५ जुलैला मोर्चा
