GRAMIN SEARCH BANNER

दापोली तालुक्यातील उटंबर येथे वक्फ जमिनीवरील सागवान तोडीवरून खळबळ; विश्वस्तांची वनविभागाकडे तक्रार

दापोली (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे उटंबर येथील हजरत पीर बावा याकुब सर्वरी दर्गा देवस्थानच्या वक्फ वर्ग-२ जमिनीवरील सागवान आणि फणसाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दर्गा विश्वस्तांनी वनविभागाकडे धाव घेत तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित जमीन न्यायप्रविष्ट असताना झाडे तोडण्यास परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दर्ग्याचे सचिव जहुर हसनमियाँ झोंबडकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, उटंबर येथील सुमारे ६५३ एकर देवस्थान व वक्फ जमिनीचे प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायालयात प्रलंबित आहे. संबंधित सर्व्हे नं. १३०/१ च्या ७/१२ उताऱ्यावर ‘सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी’ असा स्पष्ट शेरा असतानाही, १ फेब्रुवारी २०२५ रोजी केवळ एका व्यक्तीच्या नावे ही वृक्षतोडीची परवानगी देण्यात आल्याचा आरोप विश्वस्तांनी केला आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी या जमिनीवर सागवान आणि फणसाची झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे विश्वस्त फैयाज आणि रहिमान मुजावर यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी लाकूड भरत असलेल्या एका वाहनाला अडवून विचारणा केली असता, काही स्थानिकांच्या सांगण्यावरून ही तोड केल्याचे समोर आले.

या प्रकाराची माहिती मिळताच दर्ग्याचे अध्यक्ष मकबुल दिनवारे यांनी तातडीने दापोली वनविभागाशी संपर्क साधून छायाचित्रांसह तक्रार दाखल केली. इनाम आणि वक्फ स्वरूपाची ही जमीन वादग्रस्त असताना विश्वस्तांना विश्वासात न घेता अशी परवानगी देणे बेकायदेशीर असल्याचे विश्वस्त मंडळाचे म्हणणे आहे. या प्रकरणात तातडीने पंचनामा करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही विश्वस्तांनी दिला आहे. उटंबर परिसरातील या मोठ्या वृक्षतोडीमुळे सध्या परिसरात मोठी खळबळ उडाली असून, यावर वनविभाग नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3473551
Share This Article