GRAMIN SEARCH BANNER

मराठा विद्यार्थ्यांना मिळणार ‘ओबीसी’प्रमाणे सवलती; राज्य सरकारचा निर्णय

Gramin Varta
50 Views

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यात प्रामुख्याने आठ निर्णयांचा समावेश आहे. ‘शालान्त परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना’ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी नुकतेच उपोषण आंदोलन केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रसाद लाड यांनी जरांगे यांची यशस्वी समजूत घालून हे उपोषण स्थगित केले होते. यावेळी सरकारने जरांगे यांना विविध आश्वासने दिली होती. त्या पार्श्वभूमीवर हा अध्यादेश काढण्यात आला आहे. या शासन निर्णयातील तरतुदी चालू शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) लागू होणार आहेत.

शासन निर्णयांव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील.

या योजनांचे मिळतील लाभ

१) ‘शालान्त परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना’ लागू करणार.
२) वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना सारथीमार्फत राबविणार.
३) ओबीसी प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात येणार.
४) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीची व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविणार.
५) अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना लागू करणार.
६) महाराष्ट्राल रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ओबीसी उमेदवारांसाठीची योजना मराठा विद्यार्थ्यांना लागू करणार.
७) ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी, मराठा समाजातील विद्यार्थीदेखील पात्र.
८) केंद्रिभूत प्रवेश पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करणार.

Total Visitor Counter

3473107
Share This Article