संगमेश्वर :- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले.
या स्पर्धेत विविध तालुक्यांमधील नामांकित शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीपासूनच पालशेतकर विद्यालयाच्या दोन्ही संघांनी खेळातील शिस्त, संघभावना व तांत्रिक कौशल्य यांचा सुंदर संगम साधत प्रतिस्पर्ध्यांवर आपले वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात मुलांच्या संघाने रोमांचक खेळ करीत विजय मिळवला, तर मुलींच्या संघाने निर्णायक फेरीत अप्रतिम खेळ सादर करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे प्रशिक्षक अतुल अशोक जाधव यांचे मार्गदर्शन, तसेच मुख्याध्यापक रमेश बोलभट यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. या दुहेरी विजयामुळे पालशेत परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यालयाचे हे यश संपूर्ण गुहागर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.रयत शिक्षण संस्थेचे जनरल समिती सदस्य प्रशांत पालशेतकर,स्कूल कमिटी सदस्य ,शालेय व्यवस्थापन, शिक्षकवृंद व पालकांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पालशेतकर विद्यालयाचा जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत दुहेरी विजय
