रत्नागिरी: गांधी जयंती सप्ताहानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता करण्यात आली. प. पू. स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, बाळ सत्यधारी महाराज, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा खनिकर्म अधिकारी भाग्यश्री जोशी, तहसिलदार मीनल दळवी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, समाज कल्याण विस्तार अधिकारी विश्वनाथ बोडके, मिरजोळे उपसरपंच राहुल पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात प. पू. स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्त केंद्राचे सुधाकर सावंत यांनी उपस्थितांना व्यसनमुक्ती संकल्प प्रतिज्ञा दिली.
“मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहील. मी भारताचा नागरीक भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी, मी प्रयत्नशिल राहीन. मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरीकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा आदर करीन.”
या प्रतिज्ञेनंतर प्रांत कार्यालय परिसर, तहसिलदार कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता.