मंडणगड : तालुक्यातील शिरगाव परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. सकाळी अंदाजे 9.30 वाजता टँकर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा प्रकार घडला. जखमींमध्ये तन्मय सतेंद्र देव (28, सेवालाल नगर, मंडणगड) आणि प्रेमळ पांडुरंग भोजने (45, तुळशी) यांचा समावेश आहे.
अपघातानंतर तातडीने त्यांना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना पुढील उपचारांसाठी माणगाव रुग्णालयात हलवण्यात आले.
टँकर (केए 28 बी 6360) चालक सुनीलकुमार बलदेवराज यादव हा शिरगावमार्गे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिल्याची माहिती मिळते. धडक झाल्यानंतर दोन्ही प्रवासी रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले.
अपघाताची बातमी कळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वैशाली सुकाळे करत आहेत.
मंडणगड : शिरगावमध्ये टँकरची दुचाकीला जोरदार धडक; 2 गंभीर जखमी






