देवरुख: गोताडवाडीत ‘जलजीवन’ असतानाच नवी योजना मंजूर; उपसरपंचांवर शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

संगमेश्वर: जलजीवन मिशनची योजना सुरू असतानाच त्याच वाडीसाठी पुन्हा १० लाख रुपयांची नवीन पाणी योजना मंजूर करून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार मोर्डे-करंबेळे ग्रामपंचायत हद्दीतील गोताडवाडी येथे समोर आला आहे. या दुहेरी योजनेमुळे संगमेश्वर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून उपसरपंचांनी दिशाभूल केल्याचा थेट आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी सरकार जलजीवन मिशनसारख्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र याच योजनांच्या आडून मोठा आर्थिक ‘झोल’ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोताडवाडीमध्ये आधीच जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण होऊन नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. असे असतानाही, याच वाडीसाठी पुन्हा नवीन पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या नवीन कामाचे श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांमध्ये आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली आणि पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीचा उल्लेख करण्यात आला असून उपसरपंच कृष्णा काबदूले यांनी ही योजना मंजूर करून आणल्याचा दावा केला आहे. एकाच ठिकाणी दोन स्वतंत्र योजना राबवून शासकीय निधीचा अपव्यय का केला जात आहे, असा संतप्त सवाल सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे. एका वाडीला दोनवेळा लाभार्थी दाखवून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली आहे का, याचा तपास होणे आता गरजेचे बनले आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, जलजीवन मिशनद्वारे घरोघरी पाणी पोहोचलेले असताना या नवीन १० लाख रुपयांच्या योजनेचे लाभार्थी नेमके कोण आहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे. ही योजना लोकहितासाठी आहे की केवळ कमिशन लाटण्यासाठी आखली गेली आहे, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि निधी लाटण्यासाठी चुकीची माहिती देऊन ही योजना मंजूर केल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक स्तरावरून दिला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *