GRAMIN SEARCH BANNER

दापोली बाजारपेठेत भीषण आग; पाच दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

Gramin Varta
125 Views

दापोली: दापोली शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. हॉटेल सन्मानसमोरील बिपिन कॉर्नर परिसरात लागलेल्या या आगीत मोबाईल शॉपी आणि ज्वेलरीसह एकूण पाच दुकाने जळून खाक झाली असून यामध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहराच्या शिवसेना शाखेजवळील काही दुकानांतून धूर येत असल्याचे दिसताच स्थानिक युवक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी श्री पंचमुखी मारुती मंदिराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने नगरपंचायत कार्यालयातून फायर बुलेट आणली. फायर बुलेट चालवण्याचा कोणताही पूर्व अनुभव नसतानाही रेमजे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि तत्परतेमुळे आग विझवण्यास मोठी मदत झाली.

या कार्यात धोपट पाणीवाले, संदीप नायक, नितीन शिंदे, अपी मोरे या नागरिकांनी पाण्याची व्यवस्था करून आग नियंत्रणात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. माजी सरपंच दिनेश नायक यांनी फायर बुलेटसाठी पाणीपुरवठ्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. स्थानिक नागरिक आणि युवकांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. दापोली नगरपंचायतीकडे स्वतःचा अग्निशामक बंब नसल्याने सुरुवातीला अडचणी आल्या, त्यामुळे खेड नगरपरिषदेचा बंब मागवण्यात आला होता. मात्र तो येईपर्यंत स्थानिकांनी आग आटोक्यात आणली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बाजारपेठेत वेळेवर मदत करणाऱ्या अमित रेमजे आणि स्थानिक तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3256215
Share This Article