चित्रीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते तौसिफ पांजरी यांचे विशेष सहकार्य
रत्नागिरी: महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील नयनरम्य ठिकाणे आता साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीलाही भुरळ घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि कीर्ती सुरेश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रावडी जनार्दन’ या बहुचर्चित चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण गाण्याचे चित्रीकरण नुकतेच जयगडच्या सुंदर खाडीत पार पडले. या चित्रीकरणासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तौसिफ पांजरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली.
गेल्या काही दिवसांपासून ‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाचे चित्रीकरण रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे परिसरात सुरू आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि कीर्ती सुरेश ही हिट जोडी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील एका गाण्यासाठी खास जयगड खाडी परिसराची निवड करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रीकरणाच्या वेळी विजय देवरकोंडा आणि कीर्ती सुरेश एका होडीत बसलेले असून, हे दृश्य या चित्रपटातील एका प्रेमगीताचे असल्याचे समजते. कोकणच्या शांत खाडीतील निसर्गरम्य वातावरणामुळे हे गाणे अत्यंत प्रभावीपणे चित्रित झाले आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य:
या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रीकरणासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तौसिफ पांजरी यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला विशेष सहकार्य केले. चित्रीकरणाच्या आवश्यकतेनुसार लागणाऱ्या होड्या, बोट, मासेमारीच्या जाळ्या आणि इतर सर्व साहित्य पांजरी आणि त्यांचे सहकारी खुतबुद्दीन गडबडे यांनी उपलब्ध करून दिले.
केवळ साहित्य पुरवणेच नाही, तर चित्रीकरणाच्या आधी तब्बल १० दिवस संपूर्ण तयारी व्यवस्थित पार पाडण्यात आली. जयगडच्या नैसर्गिक वातावरणात इतक्या मोठ्या साऊथ इंडियन चित्रपटाचे चित्रीकरण होणे, ही स्थानिक लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना तौसिफ पांजरी यांनी यावेळी व्यक्त केली.
तौसिफ पांजरी यांच्यासोबत खुतबुद्दीन गडबडे यांनीही चित्रपटाच्या टीमला आवश्यक ती सर्व मदत पुरवून कोकणची पाहुणचार संस्कृती जपली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याची दखल घेतल्याने, भविष्यात जयगडची खाडी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य ठिकाणे जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.






