GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Gramin Varta
3 Views

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि हिवताप आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. सर्व कर्मचारी या लढ्यात एकत्रितपणे उतरले असून, शासनाने तातडीने मागण्या मान्य करून न्याय द्यावा, अशी आग्रही भूमिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वासित प्रगती योजनेचे १०, २० आणि ३० वर्षांचे टप्पे वेळेत पूर्ण करून त्याचा लाभ मिळवून देणे, तसेच अनेक वर्षांपासून अल्प मानधनावर सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, जेणेकरून कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण कमी होईल आणि आरोग्य सेवकांचे पदनाम बदलण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी दापोलीतील कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

तालुक्यातील आरोग्य केंद्रांवरील कामावर बहिष्कार टाकून हे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला असून, आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. संबंधितांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतूनही केली जात आहे.

Total Visitor Counter

3316177
Share This Article