दापोली: रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली असून, स्वतःच्या १४ वर्षीय पुतणीचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम चुलत्याविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर तुकाराम चौगुले (वय ६५, रा. कारगिलनगर, विरार पूर्व) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रहिवासी असून, या घटनेमुळे दापोली परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही विरार पूर्व येथील एका शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. २०२२ मध्ये एका कौटुंबिक कार्यानिमित्त ती विरारला आपल्या नातेवाईकांकडे आली होती. त्यावेळी घरात कोणी नसताना आरोपी चुलता किशोर चौगुले याने तिचा विनयभंग केला होता. इतकेच नव्हे, तर या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडितेली दिली होती. या धसक्यामुळे पीडितेने बराच काळ हा प्रकार कोणाजवळही सांगितला नाही.
मात्र, आरोपीची हिंमत वाढल्याने त्याने पुन्हा डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. १ आणि २ डिसेंबर रोजी त्याने पीडितेचा पाठलाग करून तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर आरोपीच्या जाचाला कंटाळून आणि धाडस एकवटून पीडितेने आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून हादरलेल्या पालकांनी तातडीने विरार पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत विरार पोलिसांनी आरोपी किशोर चौगुले याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ११५(२), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८७/२०२५ अन्वये नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक लालु मारुती तूर या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. दापोलीतील मुलीसोबत विरारमध्ये घडलेल्या या प्रसंगामुळे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नात्यांमधील विकृती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.






