रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे पाडावेवाडी येथील अत्यंत सुस्वभावी आणि हसतमुख व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले श्रीकांत बाळकृष्ण पाडावे (वय ४१) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनामुळे सर्वपरिचित असलेल्या त्यांच्या मित्रपरिवारासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून गरजूंना मदतीचा हात देण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे श्रीकांत पाडावे यांचा परिसरात मोठा सलोखा होता. पाडावेवाडी येथील ‘एकता परिवारा’चे ते एक आधारस्तंभ होते. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये ते टी. जे. मरीन कंपनीत कामाला होते. गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी मिळताच पाडावे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर त्यांच्या मित्रपरिवाराला जबर धक्का बसला. शनिवारी, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात मिरजोळे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.