रत्नागिरी / प्रतिनिधी
उत्सव सेवा पर्वाचा,शुभारंभाला मुहूर्त दिवाळीचा ; स्वप्न विकसित भारताचे,भान जपूया उत्कृष्ट नागरिकत्वाचे ; विकसित भारत सेवा पर्व,नागरिकांनो बाळगूया गर्व ; तिलांजली विविध व्यसनांना, बळ देऊया विकसित भारताच्या स्वप्नांना ; एक भारत श्रेष्ठ भारत, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, स्वच्छता हीच सेवा : जबाबदारी आपलीही अशा विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत सेवा पर्वाची संकल्पना घरोघरी पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं.१ च्या विद्यार्थ्यांनी आकाशकंदील कार्यशाळेच्या माध्यमातून केला आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने समाजात जनजागृती व्हावी यादृष्टीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या संकल्पना आदर्श शाळा नाखरे नं. १च्यावतीने हाती घेतल्या आहेत. त्यासाठी उपक्रम प्रमुख पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर पुढाकार घेत असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे यांनी दिली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा उद्देश केवळ बौद्धिक विकास नसून त्याचबरोबर चारित्र्य निर्माण आणि एकविसाव्या शतकातील मुख्य कौशल्ययुक्त संपूर्ण व सर्वांगीण विकसित व्यक्ती निर्मिती असेल हे लक्षात घेऊन तसेच शाळांमधील विद्यार्थी एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमात सहभागी व्हावेत, विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि सर्जनशीलता यांना उमलण्याची संधी मिळावी, त्यांना लहान वयातच योग्य तेच करणे याचे महत्त्व समजावे, शाळेचा एक सामाजिक चेतना केंद्र म्हणून वापर व्हावा आदि विविध उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत मीना राजू मंचाच्या माध्यमातून 150 आकाश कंदील तयार करून त्यांची विक्री करण्यात आली. अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांच्या हातातून साकारलेले आकाश कंदील घरोघरी लावताना ग्रामस्थात एक वेगळी ऊर्जा निर्माण होऊन शाळेबद्दल आपुलकी निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया उपसरपंच विजय चव्हाण यांनी दिली.
विदयार्थ्यांत व्यवहारकौशल्य वाढीस लागावे, देवाणघेवाण संवाद विकसित व्हावा यादृष्टीने प्रतीवर्षी आयोजित केलेल्या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रामदास लांजेकर, सरपंच विद्या जाधव, केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय सोपनूर यांनी विशेष कौतुक केले आहे. कार्यशाळा यशस्वीतेसाठी शिक्षिका श्रावणी केळकर, अंगणवाडीताई मंगला चव्हाण, मदतनीस योगिता शिंदे, अपेक्षा नार्वेकर, पूजा धुळप, मनिषा धुळप आणि मीना राजू मंचाचे विशेष सहकार्य लाभले.