गुहागर/ उदय दणदणे: तालुक्यातील पालशेत बाजारपेठेतील सत्यवान भायनाक यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून अंधारात दिवस काढत आहे. घराजवळील जीर्ण विद्युत खांबाची दुरुस्ती न झाल्यामुळे त्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
भायनाक यांच्या घराशेजारील दीपक शिरगावकर यांच्या दुकानासमोर एक जुना विद्युत खांब आहे. हा खांब अत्यंत जीर्ण झाला असून, त्यावर वारंवार स्पार्किंग होत आहे. यामुळे भायनाक यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. या खांबावर चढून दुरुस्ती करणे धोकादायक असल्याने कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत.
भायनाक यांनी ही समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पालशेत विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांच्याकडे मांडली. विखारे यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी महावितरणचे पालशेत व्यवस्थापक आणि गुहागर येथील उपअभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी या धोकादायक खांबाची तातडीने पाहणी करून तो बदलण्याची मागणी केली आहे.
या गंभीर समस्येकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या समस्येमुळे परिसरातील इतर नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. महावितरण यावर कधी कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.