संगमेश्वर/मकरंद सुर्वे: मुंबई-गोवा महामार्गावरील ओझरखोल हे ठिकाण अपघातांचे केंद्र बनले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची धूळ खाली बसत नाही तोच,आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा येथे दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात घडला आहे. या अपघातात परचुरी येथील 2 सख्खे भाऊ जखमी झाले आहेत. अथर्व चंद्रशेखर गुरव (21, परचुरी, ता. संगमेश्वर), शुभम चंद्रशेखर गुरव (21, परचुरी, ता. संगमेश्वर) असे गंभीर जखमी झालेल्या दोन्ही सख्ख्या भावांची नावे आहेत.
अपघातानंतर स्वामी समर्थ ॲम्ब्युलन्सचे दिपेश राऊत यांनी संगमेश्वर येथे दाखल केले. जखमी दोघांवर प्राथमिक उपचार करून रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कार चालक रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने चालला होता. ओझरखोल आला दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील अथर्व आणि शुभम जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना दिपेश राऊत यांनी आपल्या ॲम्ब्युलन्सने त्वरित संगमेश्वर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र चार दिवसातच या ठिकाणी अपघात घडल्याने महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका वाहन चालकाना बसत आहे असे बोलले जात आहे.
ठेकेदाराच्या चुकीच्या ‘डायव्हर्जन’मुळे वाढता अपघातांचा धोका
मुंबई-गोवा महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडले आहे. अनेक ठिकाणी महामार्गाची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी तर हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. या परिस्थितीला सामोरे जात असतानाच, महामार्ग ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचा अंदाज न घेता आणि वाहतुकीच्या नियमांची पर्वा न करता, चुकीच्या पद्धतीने ‘डायव्हर्जन’ टाकल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
ओझरखोल येथील वारंवार होणारे अपघात हे ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्ष आणि नियोजनशून्यतेचे द्योतक आहेत. रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि त्यात चुकीची वळणे यामुळे चालकांना दिशाभूल होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.