पत्नीचे अधीक्षकांना निवेदन; ‘त्या’ पोलिसांच्या चौकशीची मागणी
रत्नागिरी : शहराजवळील कर्ला लिमयेवाडी येथील पोलिस पाटील उदय लिमये यांच्या आत्महत्या प्रकरणाने कलाटणी घेतली आहे. त्यांची आत्महत्या नसून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, असा आरोप त्यांच्या पत्नी जयश्री उदय लिमये (रा. कर्ला लिमयेवाडी) यांनी केला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पालकमंत्री उदय सामंत यांची त्यांनी भेट घेतली असून सामंत यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. उदय मधुसूदन लिमये यांचा २८ मे रोजी मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पोलिस उपनिरीक्षक विशे यांचे वागणे हे संशयास्पद वाटल होते. त्यांनी पतीच्या मृत्यूनंतर पतीची डायरी व मोबाईल हा कोणताही पंचनामा न करता ताब्यात घेतला असून त्याबाबत कोणतीही पोचपावती दिली नसल्याचा आरोप जयश्री लिमये यांनी निवेदनातून केला आहे. १९ जूनला पोलिस निरीक्षक भिसे यांनी अन्य एखादा महत्वाचा पुरावा नष्ट केला असावा, अशी आमची शंका आहे. श्री. भिसे यांच्या कॉल्सची सविस्तर माहिती तक्रार अर्जामध्ये दिली आहे. असे कोणते बोलणे झाले की यामुळे पती उदय लिमये हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले. तसेच फोनवरील संभाषणाची पूर्ण माहिती काढून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर तत्काळ रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे लिमये यांनी निवेदनात म्हटले आहे.
पोलिस पाटील उदय लिमये आत्महत्या प्रकरणाला कलाटणी, आत्महत्या नसून..
