टँडम सायकलवरून ४२ दिवसांत केला ३८०० किमीचा प्रवास
चिपळूण : येथील रहिवासी डॉ. सौ. मनिषा वाघमारे यांनी बंगलोर येथील नामवंत सायकलिस्ट डॉ. मीरा वेलणकर यांच्यासह टँडम सायकलवरुन प्रवास करून ४२ दिवसांत ७ राज्यांमधून ३८०० किमीहून अधिकचा प्रवास करत एक नवा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. भारताचे पूर्वेकडील पहिले गाव किबिथू येथून सुरू झालेला प्रवास अरुणाचल, आसाम, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधून होत भारताच्या पश्चिम टोकावरील कोटेश्वर येथे समाप्त झाला. या दोन्ही टोकांच्या दरम्यान या जोडगोळीने टँडम प्रकारची सायकल वापरून ईस्ट टू वेस्ट असा सुमारे ३८०० किमीपेक्षा जास्त अंतर कापून जागतिक विक्रम नोंदवला आहे.
१५ मे रोजी किबीथू येथे इंडो- तिबेट सीमा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेला झेंडा दाखवला आणि हा प्रवास सुरू झाला. अरुणाचल प्रदेशमधील या अत्यंत दुर्गम भागातील खडबडीत रस्ते, तीव्र चढ उतार, सतत कोसळणाऱ्या दरडी, चिखल यांचा सामना करीत आसाममध्ये त्यांचा प्रवेश झाला. आसाममध्ये विविध वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांची दखल घेत विशेष मुलाखतींचं आयोजन करुन दोघींनाही पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
काझीरंगात दिसले हत्ती, गेंडे, मोर
अरुणाचलमधील प्रवासाने मात्र सायकलची हाडं खिळखिळी केल्यामुळे तिची दुरुस्ती अनिवार्य झाली. आसाममधील काझीरंगा अभयारण्यातून जाताना गेंडे, हत्ती, हरणं, मोर यांचं दर्शन झाल्याने दोघींचा उत्साह दुणावला. प.बंगालची हद्द येईपर्यंत सायकलच्या विविध पार्ट्सनी आपापली दुखणी काढली. पंक्चरने तर पाठच सोडली नव्हती. सेल्फ सपोर्टेड राईड असल्याने सर्व परिस्थितीला धैर्याने तोंड देत स्वतःचे आणि सायकलचे आरोग्य जपत त्यांनी प. बंगालमधे प्रवेश केला. चिकन नेक असं वर्णन असलेल्या भारताच्या या भूभागाला नेपाळ, बांगलादेश, चीन आणि भूतान यांनी वेढलेलं असल्याने इथे वैयक्तिक सुरक्षा हा सतत चिंतेचा विषय असतो. जगप्रसिद्ध रसगुल्याचा आस्वाद घेत दोघींचा बिहारमध्ये प्रवेश झाला.
इथे येईपर्यंत त्यांच्या सायकलची इतकी दुरवस्था झाली की आता दुरुस्तीऐवजी नवीन सायकल विकत घेणे अनिवार्य झाले. नवीन सायकल ताब्यात मिळेपर्यंत जुन्याच सायकलची ठिकठिकाणी दुरुस्ती करत त्यांनी बिहार राज्य पार केले.
रामलल्लाचे घेतले दर्शन
उत्तर प्रदेशमध्ये आल्यावर अयोध्येला जाऊन रामलल्लाचे आशीर्वाद घेऊन नव्या सायकलवरुन दोघींनी कानपूरमार्गे आग्रा गाठले. आग्रा अगदी नजरेच्या टप्प्यात असताना एका बाईकने या दोघींना धडक दिली. सुदैवाने किरकोळ मोडतोडीवर निभावलं. त्यांनी येथे वर्ल्ड अल्ट्रा सायकलिस्ट असोसिएशनच्या एका नव्या विक्रमाची नोंद केली. किबीथू ते आग्रा या दरम्यान दोन महिलांनी टँडम सायकलने केलेल्या प्रवासाचा विक्रम नावावर झाल्यामुळे मनावरुन अपघाताचं सावट निघून गेलं.
वाळवंट, वारा, उन्हाच्या झळा
बिहार, उत्तर प्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्ये प्रवेश झाल्यानंतर उन्हाच्या कडाक्याने परिसीमा गाठली. अगदी ४७° पर्यंत पोचलेल्या तापमानाने त्यांच्या निश्चयाची जणू परीक्षाच पाहिली. परंतु रोजच्या वेळापत्रकात बदल करून दोघींनी आपला प्रवास सुरुच ठेवला. राजस्थानमधील विरळ वस्तीच्या भूभागातून प्रवास झाल्यानंतर मोहिमेच्या अंतिम राज्यात म्हणजे गुजरात राज्यात प्रवेश झाला तरीही हा भूभाग राजस्थानशी साधर्म्य दाखवणारा आहे. उष्ण हवेच्या झळा, समोरुन येणारा वारा, रखरखीत वाळवंटी प्रदेश ओलांडत कच्छच्या रणातील त्यांचा प्रवास तितकाच खडतर होता. दोन्ही बाजूस मिठाचा प्रदेश आणि मधून जाणारा रस्ता म्हणजे निव्वळ नयनसुख पण काही काळानंतर तेच त्रासदायक होऊ लागतं. मिठावरुन परिवर्तीत होणारा सूर्यप्रकाश गॉगलमधून पण सहन होत नाही. रोड टू हेवन असं नाव असलेला निर्जन आणि आव्हानात्मक असा हा भूभाग पार करुन पुढे आल्यावर आपण आपल्या उद्दिष्टाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात आलोय या अनिवार आनंदात उर्वरित अंतर पार करुन दोघी कोटेश्वर येथे पोचल्या.
किबीथू ते कोटेश्वर हे अंतर टँडम सायकलने पार करणा-या पहिल्या महिला सायकलिस्ट हा विक्रम दोघींनी पूर्ण केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून डॉ. मनिषा व डॉ. मीरा यांच्या या विक्रमाची नोंद घेतली जात असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा होईल.
डॉ. मनिषा वाघमारे, डॉ. मीरा वेलणकर यांची जागतिक विक्रमाला गवसणी

Leave a Comment