चिपळूण: मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यात नैसर्गिक आपत्तीने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यातच मुंढेतर्फे सावर्डेत शॉर्ट सर्किटने गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना गुरूवार दि. १९ जून रोजी घडली. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर पिलवली तर्फे सावर्डे येथे तीन गुरे वाहून गेली. आगवे लिबेवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रामपूर परिसरात वीज खांब कोसळून तर वीज वाहिन्यांवर झाडे, फांद्या पडून या भागातील विद्युत पुरवठा तब्बल १४ तास बंद होता.
गेले चार ते पाच दिवस तालुक्यात पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. या पावसात पिलवलीतर्फे सावर्डे येथील संतोष जानू पवार यांची एक दुभती गाय व दोन पाडे सोमवार दि. १६ जून रोजी वाहून गेले होते. त्या पैकी मृतावस्थेतील गायीचा शोध लागला असून उर्वरित दोन गुरांचा शोध सुरु आहे. गुरूवार दि. १९ जून रोजी मुंढे तर्फे सावर्डे येथे वसंत रामा येडगे यांच्या गुरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने एकच धावाधाव उडाली. सुदैवाने या आगीत गुरे अथवा मनुष्य हानी झालेली नाही. मात्र, या आगीमुळे गुरांचा गोठा जळून खाक झाल्याने त्यामध्ये पवार यांचे सुमारे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर गुरूवारी सकाळी ६ वा. आगवे लिबेवाडी येथील शांताराम सोमा खांबे यांच्या घरावर झाड पडून सुमारे २६ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. कामथे खुर्द येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत संरक्षण भिंतीच्या वरील बाजूस मोठे दगड असून, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दगडालगत असणारी माती खाली येऊन जीवितहानी होण्याची निर्माण झाली आहे. रामपूर-घोणसरे-मार्गताम्हाणे परिसरात सोसाट्याचा वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसात चिवेली फाटा जवळ विद्युत वाहिनीवर मोठे झाड पडल्याने रामपूर परिसरातील अनेक गावातील विद्युत पुरवठा तब्बल १४ तास बंद होता. मार्गताम्हाणे येथे रविंद्र देवजी तांबिटकर यांचा गोठा पावसामुळे कोसळून नुकसान झाले. कात्रोळी कुंभारवाडी येथे विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याची घटनाही घडली. तर उभळे येथेही विद्युत खांब पडून वीज वाहिन्या तुटल्या. :
परशुराम येथे काहींना विजेचा झटका चिपळूण तालुक्यातील परशुराम येथील हॉटेल रिव्हर व्ह्यू परिसरात मुख्य विद्युत वाहिनी तुटून पडल्याने काहींना विजेचा झटका बसल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याबाबत येथील ग्रामस्थांनी लोटे येथील महावितरण कार्यालयाकडे संपर्क साधून देखील संबंधित यंत्रणांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात रात्री उशिरापर्यंत अंधार पसरला होता.