सचिन यादव / धामणी
मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात सणाची लगबग सुरू झाली आहे. या सणाच्या गोडव्यात भर घालणाऱ्या पारंपरिक मातीच्या वाणांच्या निर्मितीसाठी कुंभार समाजातील कारागीर सध्या विशेष मेहनत घेताना दिसत आहेत. फिरत्या चाकावर देसी मातीला आकार देत सुगडे, मातीची भांडी व विविध वाण घडवताना कुंभारांचे हात अहोरात्र झिजत आहेत.
ग्रामीण भागात आजही मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनी एकमेकींना मातीची वाण देण्याची प्राचीन परंपरा जपली जाते. प्लास्टिक व आधुनिक साहित्याचा वापर वाढला असला तरी पर्यावरणपूरक आणि संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मातीच्या वाणांना अजूनही विशेष मागणी आहे. कुंभारांच्या हातून साकारलेली ही वाण केवळ वस्तू नसून परंपरा, निसर्गाशी असलेली नाळ आणि सांस्कृतिक ओळख जपणारी मानली जाते.
भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीचा सण गृहिणींच्या आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो. ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ या संदेशातून समाजातील प्रेम, आपुलकी आणि सलोखा वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला जातो. दिवाळीनंतर वर्षातील हा एकमेव सण कुंभार समाजाच्या जीवनात काही प्रमाणात आर्थिक गोडवा आणणारा ठरतो.
मात्र बदलत्या काळात कुंभार व्यवसायासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. माती, लाकूड व इंधन मिळवणे दिवसेंदिवस महाग होत चालले असून उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत मातीच्या वाणांची मागणी काहीशी घटली असून नव्या पिढीचा या पारंपरिक व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत असल्याचे चित्र आहे.
कुंभार कारागीर सांगतात की, पूर्वी वृद्ध व अनुभवी मंडळी हे काम मनापासून आणि चिकाटीने करत असत. मात्र आज शिक्षण व इतर रोजगाराच्या शोधात तरुणपिढी या व्यवसायापासून दूर जात आहे. माती व लाकूड गोळा करण्याचे कष्टाचे काम करण्याकडे नवयुवकांचा कल कमी होत असल्याने भविष्यात ही परंपरा टिकवणे आव्हानात्मक ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या दरात यंदा मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. अपेक्षित पाऊस व पोषक वातावरण न मिळाल्यामुळे तिळाचे उत्पादन घटले असून बाजारात तिळाची आवक मर्यादित आहे. परिणामी दरात वाढ झाली असून सध्या तिळाचे दर सरासरी १५० रुपये प्रति किलो इतके आहेत. काही ठिकाणी यापेक्षाही अधिक दराने तिळाची विक्री होत आहे.
शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये रेडिमेड तिळगुळाचीही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असून ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संक्रांतीच्या सणात गोडवा टिकून राहावा यासाठी ग्राहकांची धडपड सुरू असली तरी परंपरा जपणाऱ्या कुंभारांच्या भवितव्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.






