संगमेश्वर : खेड तालुक्यातील बोरज येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा नाष्टा करत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी नेत असताना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. सचिन सखाराम घोसाळकर (वय ५३, रा. बोरज, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सचिन घोसाळकर हे नाष्टा करण्यास बसले होते. नाष्टा झाल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
घोसाळकर यांना अस्वस्थ वाटू लागताच त्यांचे सहकारी समिर शशिकांत सांडव आणि इतर कामगारांनी तातडीने १०८ ॲम्बुलन्सच्या मदतीने त्यांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वांद्री येथे नेले.
वांद्री येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोसाळकर यांची तपासणी केली आणि अधिक उपचारांसाठी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी २.२७ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिसांत एएमआर क्रमांक ३०/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वांद्री येथे क्रशरवर काम करणाऱ्या कामगाराचा आकस्मिक मृत्यू
