लांजा, (प्रतिनिधी)- प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे नदी वहाळ पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली होती. केतन श्रीपत खेगडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशासन, ग्रामस्थानी शोध घेतला असता आज सकाळी 8 वाजता त्याचा मृतदेह गावातील सतीचा जाळ येथे आढळून आला.
सविस्तर वृत्त असे की, प्रभानवल्ली येथे दोन सख्खे चुलत भाऊ वहाळ पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे दोघेही पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये सापडले. यापैकी एकजण सुखरूपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला, मात्र दुसरा केतन श्रीपत खेगडे पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी, तहसीलदार आणि महसूल विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता केतनचा शोध घेण्यासाठी लांजा पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ आणि तरुण मंडळी शोध घेत होती. सायंकाळपर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. मात्र, पाण्याचा वेग अधिक असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. आज सकाळी पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील एका वहाळात सकाळी 8 वाजता सतीचा जाळ येथे केतन याचा मृतदेह आढळला. गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईहून गावी गणपती दर्शनासाठी आलेल्या खेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ब्रेकिंग : लांजा येथे वहाळात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
