एनसीएमसी कार्डसाठी लांजा बसस्थानकात महिलांची झुंबड

Gramin Varta
11 Views

सर्व्हर डाऊनमुळे तासनतास रांगा; ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी वाढल्या

फरहान पाटणकर /लांजा: एसटी महामंडळाच्या बस प्रवासात १ सप्टेंबर २०२६ पासून महिला तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे लांजा बसस्थानकात एनसीएमसी कार्ड मिळविण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली असून कार्ड प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडत आहे.

लांजा तालुक्यात आतापर्यंत जवळपास ११ हजार एनसीएमसी कार्डची नोंदणी झाली असून त्यापैकी सुमारे ९ हजार कार्डचे वितरण करण्यात आले आहे. त्यातच सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्येमुळे कार्डमध्ये पैसे भरणे तसेच कार्ड सक्रिय करण्यासाठी प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान ६५ वर्षांवरील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे मशिनवर उमटत नसल्याने त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी संबंधित ज्येष्ठांना पुन्हा-पुन्हा आगारात चकरा माराव्या लागत आहेत. वयोमानामुळे आधीच अडचणी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या तांत्रिक प्रक्रियेचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्याने प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी कार्ड प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. मात्र तांत्रिक अडथळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Total Visitors :
4802739
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *