GRAMIN SEARCH BANNER

सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती!

Gramin Varta
46 Views

रायगड/ उदय दणदणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये महाड तालुक्यात नवचैतन्य निर्माण करणारी एक महत्त्वपूर्ण घटना नुकतीच घडली आहे. रायगड जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेत बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव जनसेवेत कार्यरत असणारे तसेच नुकतेच शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलेले महाड तालुक्यातील सेवाभावी नेतृत्व आणि ‘विभग फाउंडेशन’ संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सुशांत गणेश जाबरे यांची पक्षाच्या युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टोळ गावचे सुपुत्र असलेले आणि युवकांचे आदर्शवत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक सुशांत जाबरे यांची ही महत्त्वपूर्ण निवड बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी, एन.एस.सी.आय (NSCI) डोम, वरळी, मुंबई येथे पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाचे) सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली, कॅबिनेट मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव नाना जगताप तसेच महाड शहराच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या सहकार्याने ही निवड झाली आहे.

या निवडीमुळे महाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशांत जाबरे यांची झालेली निवड पाहता, महाडच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाला) अधिक बळ प्राप्त झाल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत. सुशांत जाबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित गट) मधील जाहीर प्रवेशाने आणि त्यानंतर युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Total Visitor Counter

3368247
Share This Article