GRAMIN SEARCH BANNER

मालगुंड येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
40 Views

मालगुंड: ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मालगुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, समता फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड आणि ग्रामपंचायत मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मालगुंड आणि आसपासच्या परिसरातील शेकडो नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून नेत्रतपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे रुग्णांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात आली असून, ज्या रुग्णांना मोतीबिंदूचा त्रास असल्याचे निदान झाले आहे, त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व पात्र रुग्णांची आगामी काळात जिल्हा रुग्णालयात टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

या शिबिराच्या माध्यमातून केवळ तपासणीच नव्हे, तर नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार व डॉ. ऋषिकेश डोके यांनी रुग्णांना आरोग्यविषयक सेवा दिली. आरोग्य निरीक्षक परशुराम निवेंडकर यांनी या शिबिराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. याप्रवेळी नेत्रतपासणीसोबतच असंसर्गिक आजारांची देखील तपासणी करण्यात आली. या मोहिमेत सीचओ मनाली तारवे, आरोग्य सेविका अश्विनी गोवळकर, आरोग्य सेवक प्रवीण मंडले तसेच आशा स्वयंसेविका सुजाता मांडवकर आणि समीक्षा मेने यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

ग्रामपंचायत सरपंच स्वेता खेऊर आणि सदस्यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामीण भागात अशा प्रकारच्या शिबिरांची नियमित गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना हक्काचे उपचार मिळण्यास मदत झाली आहे.

Total Visitor Counter

3391871
Share This Article