मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, तसा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. केंद्र सरकारही याबाबत सकारात्मक असून त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्तही जाहीर केला. येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी पंतप्रधान मुंबईत येणार असून, याच दौर्यात ते नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-3 या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्घाटनाचा मुहूर्त आता बारा दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. आतापर्यंत या विमानतळाचा चेहरामोहरा स्पष्ट नव्हता. तो आकारास आला असून, विमाने थांबण्यासाठीचे पूलदेखील पूर्ण होऊ लागले आहेत. आठ दिवसांत ही कामे पूर्ण झाली तरी उद्घाटनानंतर पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतूक सुरू होण्यास एक महिना लागेल, असा अंदाज आहे. या पहिल्या टप्प्यात इंडिगो आणि एअर इंडियाची विमाने नवी मुंबईतून झेप घेणार आहेत.
8-9 ऑक्टोबरला होणार पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन
