मंडणगड: चोरीच्या उद्देशाने संशयास्पद अवस्थेत फिरत असलेल्या एका व्यक्तीला मंडणगड पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केली. ही घटना मंडणगड येथील एसटी स्टँडच्या बाहेरील एका शेडच्या मागे घडली. आरोपीची ओळख पटली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२३ ऑगस्ट) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंडणगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सबंधदास प्रताप मावची (पो. कॉ. १५५८) हे गस्त घालत असताना, त्यांना मंडणगड एसटी स्टँडबाहेर एका शेडच्या पाठीमागे एक व्यक्ती लपून बसलेली दिसली. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या व्यक्तीने त्याचे नाव रिजवान सरवर अली खान (वय ४०, रा. पाटरोड, ता. मंडणगड) असे सांगितले. त्याने तिथे थांबण्याचे कोणतेही समाधानकारक कारण दिले नाही. त्यामुळे चोरी करण्याच्या उद्देशानेच तो तिथे लपून बसला असल्याचा पोलिसांना संशय आला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सबंधदास मावची यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रिजवान खान याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस प्रशासन कायद्यातील १२२ (ब)(अ) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी अटक करण्यात आली आहे.
मंडणगड एसटी स्टॉपजवळ संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाला अटक
