GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : फिल्मी स्टाईलने धमकी देत तरुणाचा मोबाईल हिसकावला; ‘फोन पे’चा पासवर्ड मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
263 Views

चिपळूण : ठार मारण्याची धमकी देत तीन तरुणांनी एका तरुणाकडून ‘फोन पे’ ॲपचा पासवर्ड विचारून त्याचा मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे सोमवारी रात्री घडली. एखाद्या फिल्मी स्टाईलने घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेले हे तिघेही अवघे २२ वर्षांचे आहेत.

याप्रकरणी साहिल संतोष साळवी (२२, कोंढे), आकाश राजेश पवार (२२, मिरजोळी) आणि प्रवीण प्रमोद पवार (२२, मिरजोळी) या तिघांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा महादेव राठोड (२३, विजापूर) या तरुणाने याबाबतची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा राठोड आणि त्याचा मित्र विशाल वालीकर हे दोघे शहरातील बहादूरशेख नाका येथे थांबून बोलत होते. त्याच वेळी साहिल साळवी, आकाश पवार आणि प्रवीण पवार हे तिघे एका लाल रंगाच्या दुचाकीवरून तेथे आले.
या तिघांनी कृष्णा राठोडला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, बळजबरीने त्याचा ‘फोन पे’ ॲपचा पासवर्ड विचारला. त्याला धमकावून त्याचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून ते तिघे चोरून घेऊन गेले.

भर शहरात आणि फिल्मी स्टाईलने घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3366997
Share This Article