GRAMIN SEARCH BANNER

साखरप्याच्या यात्रेत खुलेआम जुगार; लाखोंची उलाढाल? पोलिसांकडून डोळेझाक

Gramin Varta
458 Views

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील भव्य यात्रेला यंदा परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीपेक्षा जुगाराचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसून आले. शुक्रवारी रात्री यात्रेपासून अवघ्या काही अंतरावर खुलेआम जुगाराचे फड रंगले आणि काही तासांतच लाखो रुपयांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे, हे सगळे सुरू असताना पोलीस यंत्रणा मात्र अदृश्यच राहिल्याने “हे प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

साखरपा बसस्थानक ते मुर्शी चेकपोस्ट या मार्गालगत जत्रा भरलेली असतानाच, यात्रेपासून थोड्याच अंतरावर तब्बल १३ जुगाराचे पट लावण्यात आले होते. रात्री १० वाजल्यापासून मध्यरात्री ३ वाजेपर्यंत हा जुगार निर्वेधपणे सुरू होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जुगाराचे शौकीन येथे जमले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला बेकायदेशीर प्रकार पोलिसांच्या नजरेत न येणे हे अविश्वसनीय असल्याची चर्चा रंगली आहे.

सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या यात्रेच्या नावाखाली अशा प्रकारे जुगार फोफावणे हे गंभीर आहे. मात्र त्याहून गंभीर बाब म्हणजे, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. “पोलीस कारवाई कुठे होती?”, “कोणाच्या दबावाखाली हा जुगार सुरू होता?” असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.

साखरपा नजीकच्या एका गावात आज पुन्हा जत्रा भरणार आहे. तेथेही जुगाराचे फड रंगणार असल्याची चर्चा आधीच सुरू झाली आहे. यावेळीही पोलीस यंत्रणा मौन बाळगणार की प्रत्यक्ष कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कायद्याचा धाक दाखवला जाणार की पुन्हा एकदा जुगारसम्राटांचे फावणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Total Visitor Counter

3376136
Share This Article