‘लाईनमन’ हा महावितरणचा कणा – कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

महावितरणमध्ये लाईनमनदिन उत्साहात साजरा

रत्नागिरी: ऊन, वारा, पाऊस अशा कठिण प्रसंगावर मात करत लाईनमन अहोरात्र परिश्रम घेऊन आपले वीजसेवेचे कर्तव्य बजावित असतात. ग्राहकांच्या घरातील वीजपुरवठा अखंड ठेवणारा हा लाईनमन महावितरणचा कणा आहे. महावितरणचा हा लाईनमन आता काळासोबत स्मार्ट बनत आहे, असे प्रतिपादन कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले. महावितरण रत्नागिरी परिमंडळल कार्यालयात (दि.04 मार्च) लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी दत्तात्रय पडळकर बोलत होते. याप्रसंगी मंचावर अधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने, सहाय्यक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजीत सिकनिस, जितेंद्र फुलपगारे, हरी ताम्हणकर, औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व लाईनमनचा सन्मान करण्यात आला. विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणात ठिकठिकाणी लाईनमन दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.पुढे बोलताना दत्तात्रय पडळकर म्हणाले, ‘कोकणातील लाईनमन’ हा महावितरणचा खरा योद्धा आहे. त्यांनी अविरत मुसळधार पाऊस वादळ-वारा याचबरोबर फयान, निसर्ग, तोक्ते यांसारख्या वादळातही अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम केले आहे. वाहीनीवरील बिघाड त्वरीत निपटारा करत वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम लाईनमन करत आहे. विद्युत वाहिनीवर काम करताना लाईनमनने स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यांनी आता शून्य अपघाताचे ध्येय पुढे ठेवून काम करावे. त्यांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. काळानुरूप विद्युत क्षेत्रात सूरू असलेल्या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे लाईनमन प्राप्त करत आहेत. रत्नागिरी परिमंडल मार्च अखेर शुन्य थकबाकी करण्याचे आवाहनही दत्तात्रय पडळकर यांनी केले. यावेळी उपस्थित लाईनमन यांना सहाय्यक अभियंता फारुक गवंडी यांनी सुरक्षेबाबत प्रबोधन केले व विद्युत वाहिनीवर काम करताना बाळगण्याच्या सुरक्षीतते संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश चवेकर यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन तृप्ती जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण मोहिते यांनी केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *